प्रकरण ८
कॅसल रॉक: बालाजीचं दर्शन आणि शोरूमांची वसाहत
रविवार, २७ सप्टेंबर
२७ सप्टेंबर २०२६ (रविवार, तारीख अनुमानित, R03)
निर्जन टेकडीवरचा बालाजी
रविवारी, २७ तारखेला, आम्ही पुन्हा देवदर्शनासाठी निघालो, यावेळी कॅसल रॉक (Castle Rock) इथल्या बालाजी मंदिराकडे. घरापासून सुमारे पंचवीस मैल, म्हणजे साधारण चाळीस किलोमीटर, अंतरावर.
मंदिर अतिशय निर्जन ठिकाणी, उंचावर असल्यामुळे फार शांत आणि स्वच्छ वाटत होतं. व्हिडिओ-फोटो काढायला परवानगी नसल्यामुळे मी फोन बाजूला ठेवून दिला.
आत गेलो, तर बालाजीची अतिशय सुंदर, प्रसन्न मूर्ती समोर होती, आणि होम-हवन चालू होता. दर्शन घेऊन, होम संपेपर्यंत थांबलो; आणि उत्कृष्ट अशा महाप्रसादाचा लाभ घेतला.
शोरूमांची वसाहत
कॅसल रॉक आणखी एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे, इथे सगळ्या कंपन्यांची शोरूम्स आहेत, आणि बूट, कपडे, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकच्या वस्तू इतरत्र मिळतात त्यापेक्षा अतिशय स्वस्त दरात मिळतात. स्केचर्स (Skechers), नायकी (Nike), रिबॉक (Reebok), आणि कपड्यांमध्येही प्रसिद्ध ब्रँड्स स्वस्त होते.
पण आपल्याकडे जसं बुटाचा नंबर सांगितला की दुकानदार स्वतः बूट काढून देतो, कपडे दाखवतो, तसं इथे नाही. तुमचा तुम्हीच ठरवायचं, तुमच्या नंबरचा बूट कुठे आहे, कोणता रंग, कोणत्या कंपनीचा. किंमत किती हे सांगायला कोणी नसतं; सगळं त्यावर लिहिलेलं असतं. त्यामुळे किमतीत घासाघीस करायचा प्रश्नच येत नाही. 😀🙏
अमेरिकेत कुठेच असा प्रकार चालत नाही. काउंटरवर फक्त एक व्यक्ती बसलेली असते; गप्प जाऊन रांगेत उभं राहून बिल भरायचं.
आणि कोणी काही लपवून नेण्याचा प्रयत्न केलाच, तर इथली, म्हणजे अमेरिकेतल्या सगळ्याच ठिकाणची, यंत्रणा इतकी सज्ज असते की बाहेर पडायच्या आतच तुम्ही पकडले जाता; आणि तेही पोलिसांकडून! पुढे काय होईल, सांगता येत नाही. 😀😀
आम्ही बघत असलेलं शोरूम इतकं मोठं होतं की ती एक वसाहतच होती; एका दिवसात सगळं बघणं शक्यच नव्हतं. थकून काही वेळ बसलो आणि घराकडे निघालो. 👍